Thursday, December 1, 2011

पहिली भेट - भाग २

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.

कथेचा पहिला भाग येथे दिला आहे....
____________________________________________________







...... तिला शंका तर नक्कीच गेली होती माझ्या वागण्यावर... मी ही थोडासा सावध झालो होतो. तिला आता काही सरळ सरळ समजू द्यायचे नव्हते. तिला बघताना पण चोरून चोरून बघत होतो... खूप वाईट दिवस आले होते माझ्यावर... स्वतःच्या बायकोला पण चोरून बघावे लागत होते. :) ती किचनमध्ये खूप फास्ट होती. तिने चहा तर दिलाच पण लगेच डब्बा पण दिला... मग मात्र नाइलाजाने ऑफीसला निघावे लागले.


कारमध्ये बसलो आणि विचारचक्र सुरू झाले.....



६ महिने कसे निघून गेले ते कळलेच नाही आणि तिला ओळखायला ६ महिने लागले... सर्व चुक माझीच होती... कधी लक्षच दिले नाही हिच्याकडे. घर की मुर्गी डाल के बराबर असते ना ती अशीच... तसे आमच्या लग्नाला ६ महिने होत आले. पण तरीही ती नवीनच होती मला. आता कुठे तरी आमचे नवरा-बायकोचे नाते हळूहळू उलगडायला लागले होते. मला आजही आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी मी तिला बघायला गेलो होतो. माझी ही पहिलीच वेळ होती. माझ्या मित्रांकडून बरेच सल्ले भेटले होते. काय विचारावे त्यासाठी..पण ते विचारण्यासारखे नव्हते. मी माझ्या घरच्यांसोबत तिच्या घरी गेलो. गेल्या गेल्या काय? कसे? त्रास झाला का? इत्यादी इत्यादी प्रश्न झाले. मला तर अगदी युध्दावर गेल्यासारखे वाटत होते. थोडा घाबरलेला, थोडा गोंधळलेला.... नेमक्या भावना शब्दात मांडणे खूप कठीण आहे. वडीलधाऱ्यांना तर फक्त कारणच लागते. त्यांच्या गप्पा फुल्ल रंगात येऊ लागल्या... पण माझी तर पूर्णपणे वाट लागली होती. मला काहीच समजत नव्हते की काय करावे? बस त्यांच्या गप्पा ऐकत बसण्याशिवाय पर्याय पण नव्हता. तेवढ्यात आतल्या घरातून एक मुलगी बाहेर आली... आणि सर्व शांत झाले. मला नक्की आठवत नाही की खरंच शांत झाले होते की मला भास झाला... पण मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. मी फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. ती खाली मान घालून पुढे चालत होती. तिने हलक्या आकाशी रंगाची साडी घातली होती. तिच्यासोबत तिची लहान बहीण होती. तिचा हात धरून तिला पुढे चालण्यास मदत करत होती. तिच्या चालण्यावरूनच समजत होते की तिला साडीची सवय नाही. मग घरातल्यांचे प्रश्न... आणि तिच्या घरातल्यांचे उत्तर हेच चालू होते बर्‍याच वेळ. शेवटी एकदाचे आम्हाला म्हटले की तुम्ही बाहेर बसून बोलू शकता. घरच्या बाहेर एक चांगला बगीचा होता. तिकडे २ खुर्च्या आणि एक टेबल ठेवला होता. तिकडे जाऊन बसलो. बराच वेळ शांतता होती. शेवटी वातावरण हलके व्हावे म्हणून मीच म्हटले,
"मी तुमचा फोटो बघितला आहे.. आणि मला तुम्ही आवडल्या आहात. फक्त आवाज नाही ऐकला... जर तो ऐकू आला तर ..."
"का?"
क्षणभर मी इकडे तिकडे बघितले..मला समजलेच नाही की तिने "का?" विचारले की माझे कान वाजले. एवढा बारीक आवाज...
"सहजच... जर तुम्ही लग्नाला हो म्हटल्या तर आयुष्यभर ऐकू येणार आवाज कसा असणार याबद्दल कुतूहल होते."
ती गालातल्या गालात हसली.
"तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा...", मी म्हटलो.
"नाही...", ती म्हटली.
आता याचा अर्थ काय समजावा??? एक शब्दात उत्तरे भेटायला लागली ना, नेमके समजत नाही की तिचे मत सकारात्मक आहे की नकारात्मक. तिचे माझ्याबद्दलचे मत समजत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून एक प्रश्न विचारला,
"तुम्हाला साडी घालायची सवय नाही ना..."
"हो, पण तुम्हाला कसे समजले???"
"तुम्ही चालताना अडखळत होता.. त्यावरून तर्क लावला...पण एक बोलू..."
"हो..."
"मला आवडेल माझ्या बायकोने साडी घातलेले..."
"मी सवय करून घेईन...”
बस्स्... माझ्या या प्रश्नाने मला पाहिजे तो कौल दिला होता...
यावरून मला आठवले की पहिल्यांदा बघितले तेव्हाच ती मला आवडली होती... आणि हेच विसरलो होतो....

मी गाडीला ब्रेक लावला. आताशा मला हा रस्ता पाठ झालाय. कितीही विचारात असलो तरीही मी हा रस्ता चुकत नाही. ऑफीस म्हणजे माझे दुसरे घरच झाले आहे... इथे खूप जवळचा असा मित्र आहे अर्णव आणि नेहमी मदत करणारी मैत्रीण आहे प्रभा. जेव्हापण हे दोघे सोबत असतात, ऑफीस लाइफ मस्त जाते. तसे या अर्णवला प्रभा आवडते. पण ऑफीसवाल्यांना खात्री आहे की प्रभाला मी आवडतो आणि अगदी माझे लग्न झाले तरीसुध्दा. असो, पण मी आणि अर्णव कधीही प्रभाचा विषय नाही काढत. किंबहुना त्याला नाही आवडत..मी प्रभाबरोबर बोललेले. पण तरीही त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये फरक नाही पडत.

ऑफीसमध्ये पोहोचलो आणि प्रभाच्या डेस्कवर गेलो तर अर्णव तिच्याशी बोलत होता. मी गप्पपणे माझ्या क्यूबिकलमध्ये जाऊन बसलो आणि कामाला लागलो. आज कामात माझे मन लागत नव्हते. मी हिच्याच विचारात होतो. मला तिच्याशी बोलायचे होते, पण मन धजत नव्हते. हक्काची बायको असूनही, एक अनामिक भीती होती मनात. तरीही हिंमत केली आणि फोन लावला. तिने उचलला.
"अग.. काय करतेस??"
"काही नाही... किचन साफ करत होते. "
"अच्छा.."
"फोन का केलात?? काही विसरलात का???"
आता हा काय प्रश्‍न झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि गप्प झालो...
"सहज केला होता...चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतो. अर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊ. आम्ही दोघे कॅंटीनमध्ये आलो.


आता तिचा कॉल आला....





(क्रमशः)


रोल नंबर ४३


No comments:

Post a Comment