Monday, December 19, 2011

पहिली भेट - भाग ३







ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.

कथेचा पहिला भाग  आणि दुसरा भाग येथे दिला आहे.... 
____________________________________________________






आता हा काय प्रश् झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि प्प झालो...

"सहज केला होता... चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतोअर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊआम्ही दोघे कॅंटीन मध्ये आलो
आता तिचा कॉल आला....

"अहो, तुम्ही ठीक आहात ना??"
"हो ग.. मी तर ठीक आहे... असे का विचारतेस???"

"नाही... सकाळीपण तुमचे वागणे थोडे वेगळे होते.. आताही कॉल केला आणि काहीच बोलले नाहीत. म्हणून विचारले..."

तिचेही बरोबर होते. मी असा वेंधळ्यासारखा वागायला लागलो तर कोणालाही शंका येणारच ना... आणि ती तर बायको होती. माझे दररोजचे वागणे बघत होती. अचानक बदल दिसल्यावर कोणीही असे विचारणारच...

"अग.. तसे काही नाही आहे.. तू काही त्रास करून घेऊ नकोस..."

"ठीक आहे... संध्याकाळी घरी केव्हा येणार???"

हा एक त्रास तर प्रत्येक लग्न झालेल्या माणसाला होतो. संध्याकाळी केव्हा येणार... प्रश्नपण तेच विचारतात आणि प्रश्नातच उत्तर ही टाकतात.

"येतो... काम संपले की... ६ च्या आसपास..."

असे बोलून मी फोन ठेवला... अर्णवला म्हटलो की आज सर्व काम ६च्या आत उरकयला हवे... नाहीतर परत संध्याकाळी फोन येईल. बेचैनीतच चहा संपवला आणि आम्ही वर निघालो. प्रभाच्या डेस्कवर गेल्या गेल्या तोंड उघडले आणि बोललो की संध्याकाळी आपल्याला राउतला जायचे आहे. तेव्हा अर्णवने असे बघितले जणू काही मी तिला डेटवर घेऊन जातोय आणि का नाही बघणार... कारण राउत एक हॉटेलचे नाव आहे आणि त्याच्यासमोरच मी त्याच्या वहिनीला घरी येण्याची वेळ सांगितली होती. आज माझ्याकडून बर्‍याच गोष्टी घडत होत्या...

दुपारी ४ला मी क्यूबिकलच्या बाहेर डोकवून बघितले तर नेहमीप्रमाणे अर्णव प्रभाच्या डेस्कवर टाइमपास करत होता. परत डोके खाली घातले. आता प्रभाला निघायला सांगायचे होते पण सांगू कसे?? तो अर्णव तर तिला सोडायला तयारच नव्हता.

मोबाइल उचलला आणि प्रभाला निघायचा मेसेज पाठवला. निरोप तर पोहोचला होता, पण तो अर्णवला ही समजला. तो माझ्यजवळ आला आणि विचारले...

"तू मला सांगणार आहेस ... हे काय चालू आहे ते???"

"चहा पीणार??"

"तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आधी..."

"अरे असे तडकाफडकी नको...थोडे शांतीला पकड... चल चहा पीऊ..."

आता मात्र गोची झाली होती. याला काहीतरी पट्टी पढवावी लागणार होती... जास्त कठीण पण नव्हते.. तरी ही....थोडा वेळ त्याला समजवले... तो मानला... तरीही अजुन एकदा म्हटलो...

"प्लीस मैत्री निभव...."

"पक्की निभवेन...."

हे वाक्य दुहेरी होते. कोणता अर्थ घ्यावा ते समजले नाही.... पण मला ही विचार करायला वेळ नव्हता. मी प्रभा ला घेऊन निघालो... तिने विचारले कुठे जायचे आहे??

"अग... आज हिच्यासाठी काहीतरी घेऊ म्हणतोय... आता तुझ्याशिवाय कोण जास्त समजणार तिला???".

"मग राउत का???"

"सहज... कॉफी प्याविसी वाटली तुझ्यासोबत म्हणून..."

तिने हे हसण्यावर नेले. ह्या मुलीपण ना पक्क्या शहाण्या असतात... मुलाचा मुख्य उद्देश हसण्यावर नेतात नेहमी....

पण ऑफीसमध्ये अर्णवने मैत्री निभावायची तयारी चालू केली होती. त्या साल्याने चक्क माझ्या घरी कॉल केला होता. आणि माझ्या बायकोला सांगितलेपण की मी प्रभासोबत बाहेर फिरायला गेलो आहे... माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. तिने त्याला उडवून लावले. पण त्या पठ्ठ्याने तिला प्रभाचा नंबर दिला आणि विचारायला सांगितले. आता मात्र तिच्या मनात थोडी भीती दाटायला सुरूवात झाली होती. तिची हिंमत होती नव्हती त्या नंबरवर कॉल करायला. पण तिचे मन स्वस्थही बसू देत नव्हते. सारखे सारखे तेच विचार येत होते मनात... हळू हळू त्या विचारांचे रुपांतर शंकेत व्हायला लागले होते. आणि का नाही होणार?? लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते आणि हे असे समजायला लागल्यावर एखादी स्त्री काय करणार??? ती पूर्णपणे बधीर झाली होती. तिला समजत नव्हते काय करावे. तरीही तिने हिंमत करून थरथरत्या हाताने फोन उचलला आणि अर्णवने दिलेल्या नंबरवर कॉल केला. इकडे प्रभाने नंबर बघितला अनोळखी होता. उचलला...

"हेलो.."

"हा..... हेलो.. हेलो.."

प्रभा इकडून हेलो हेलो करत होती...हिला समजत नव्हते की कसे विचारावे??... तेवढ्यात मी अजुन एक घोडचुक केली... फोन चालू असतानाच मी प्रभाला विचारले की स्नॅक्स काय घेणार?? तेवढ्यात फोन कट झाला होता..
इकडे तिने माझा आवाज ऐकला होता. तिला विश्वास बसत नव्हता. आता मात्र ती पूर्णपणे खचली होती. ती सारखी सारखी स्वतःला समजावत होती की कुणी दुसर्‍याचा आवाज होता... तरीही तिच्या मनात मोठा कलह माजला होता. शेवटी तिने ठरवले की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत हे सर्व खोटे आहे. तिने अर्णवला कॉल केला आणि तिच्यासोबत राउतला यायला सांगितले. तो म्हटला की टॅक्सी घेऊन येतो. इमारतीच्या खाली आल्यावर मिस कॉल देतो. त्याप्रमाणे ते दोघे निघाले. आणि राऊतला पोहोचले. माझ्या मित्राने म्हटल्याप्रमाणे मैत्री निभावली होती.

इकडे मी स्टेजवर हातात माइक घेऊन काहीतरी बोलत होतो. तिने माझा आवाज ऐकला, आणि स्टेजकडे बघितले. आमच्या दोघांची नजरानजर झाली. तिचा चेहरा खूप सुजला होता. फक्त रडायची बाकी होती. मला माझी चुक समजली होती. तरीही मी माइक हातात घेतला आणि बोललो...

"अग.. इकडे ये..."

"मित्रहो... आत्ता मी जिच्याबद्दल बोलत होतो... ती ही आहे....”

तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला नीट समजत नव्हते... थोडीशी घाबरलेली, थोडीशी कावरीबावरी, थोडीशी आश्चर्यचकित... आणि खूप राग होता तिच्या चेहर्‍यावर.... ती स्टेजकडे येऊ लागली. जवळ आली... मी प्रभाला केक घेऊन यायला सांगितले...

आणि मी माईक हातात घेतला, एक पाय दुमडून गुडघ्यवार बसून बोललो..."मी तुझा खूप आभारी आहे ... माझ्या जीवनात आल्याबद्दल..."

ती अजुनही गोंधळलेली होती. पण आता चेहर्‍यावर फक्त आश्चर्याचे भाव होते. तिला समजत नव्हते की काय होत आहे.
"असे... अचानक.. मला काही समजत नाही आहे...."

"अग... आज पहिले वर्ष पूर्ण झाले तुला पहिल्यांदा बघायला.. म्हणजेच तू माझ्या जीवनात यायला एक वर्ष पूर्ण झाले...."

आता मात्र ती तिचे आसू थांबवु नाही शकली... माझ्या छातीवर डोके ठेऊन अक्षरशः रडायला लागली.... मी तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत करू लागलो. थोड्यावेळात ती ही शांत झाली. अजूनही पूर्ण राउत हॉटेलमधली लोक टाळ्या वाजवत होते. लग्नानंतरचे हे सर्वात पहिले सर्प्राइज़ होते..... :)






रोल नंबर  ४३



Thursday, December 1, 2011

पहिली भेट - भाग २

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.

कथेचा पहिला भाग येथे दिला आहे....
____________________________________________________







...... तिला शंका तर नक्कीच गेली होती माझ्या वागण्यावर... मी ही थोडासा सावध झालो होतो. तिला आता काही सरळ सरळ समजू द्यायचे नव्हते. तिला बघताना पण चोरून चोरून बघत होतो... खूप वाईट दिवस आले होते माझ्यावर... स्वतःच्या बायकोला पण चोरून बघावे लागत होते. :) ती किचनमध्ये खूप फास्ट होती. तिने चहा तर दिलाच पण लगेच डब्बा पण दिला... मग मात्र नाइलाजाने ऑफीसला निघावे लागले.


कारमध्ये बसलो आणि विचारचक्र सुरू झाले.....



६ महिने कसे निघून गेले ते कळलेच नाही आणि तिला ओळखायला ६ महिने लागले... सर्व चुक माझीच होती... कधी लक्षच दिले नाही हिच्याकडे. घर की मुर्गी डाल के बराबर असते ना ती अशीच... तसे आमच्या लग्नाला ६ महिने होत आले. पण तरीही ती नवीनच होती मला. आता कुठे तरी आमचे नवरा-बायकोचे नाते हळूहळू उलगडायला लागले होते. मला आजही आठवतोय तो दिवस, ज्या दिवशी मी तिला बघायला गेलो होतो. माझी ही पहिलीच वेळ होती. माझ्या मित्रांकडून बरेच सल्ले भेटले होते. काय विचारावे त्यासाठी..पण ते विचारण्यासारखे नव्हते. मी माझ्या घरच्यांसोबत तिच्या घरी गेलो. गेल्या गेल्या काय? कसे? त्रास झाला का? इत्यादी इत्यादी प्रश्न झाले. मला तर अगदी युध्दावर गेल्यासारखे वाटत होते. थोडा घाबरलेला, थोडा गोंधळलेला.... नेमक्या भावना शब्दात मांडणे खूप कठीण आहे. वडीलधाऱ्यांना तर फक्त कारणच लागते. त्यांच्या गप्पा फुल्ल रंगात येऊ लागल्या... पण माझी तर पूर्णपणे वाट लागली होती. मला काहीच समजत नव्हते की काय करावे? बस त्यांच्या गप्पा ऐकत बसण्याशिवाय पर्याय पण नव्हता. तेवढ्यात आतल्या घरातून एक मुलगी बाहेर आली... आणि सर्व शांत झाले. मला नक्की आठवत नाही की खरंच शांत झाले होते की मला भास झाला... पण मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. मी फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. ती खाली मान घालून पुढे चालत होती. तिने हलक्या आकाशी रंगाची साडी घातली होती. तिच्यासोबत तिची लहान बहीण होती. तिचा हात धरून तिला पुढे चालण्यास मदत करत होती. तिच्या चालण्यावरूनच समजत होते की तिला साडीची सवय नाही. मग घरातल्यांचे प्रश्न... आणि तिच्या घरातल्यांचे उत्तर हेच चालू होते बर्‍याच वेळ. शेवटी एकदाचे आम्हाला म्हटले की तुम्ही बाहेर बसून बोलू शकता. घरच्या बाहेर एक चांगला बगीचा होता. तिकडे २ खुर्च्या आणि एक टेबल ठेवला होता. तिकडे जाऊन बसलो. बराच वेळ शांतता होती. शेवटी वातावरण हलके व्हावे म्हणून मीच म्हटले,
"मी तुमचा फोटो बघितला आहे.. आणि मला तुम्ही आवडल्या आहात. फक्त आवाज नाही ऐकला... जर तो ऐकू आला तर ..."
"का?"
क्षणभर मी इकडे तिकडे बघितले..मला समजलेच नाही की तिने "का?" विचारले की माझे कान वाजले. एवढा बारीक आवाज...
"सहजच... जर तुम्ही लग्नाला हो म्हटल्या तर आयुष्यभर ऐकू येणार आवाज कसा असणार याबद्दल कुतूहल होते."
ती गालातल्या गालात हसली.
"तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा...", मी म्हटलो.
"नाही...", ती म्हटली.
आता याचा अर्थ काय समजावा??? एक शब्दात उत्तरे भेटायला लागली ना, नेमके समजत नाही की तिचे मत सकारात्मक आहे की नकारात्मक. तिचे माझ्याबद्दलचे मत समजत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून एक प्रश्न विचारला,
"तुम्हाला साडी घालायची सवय नाही ना..."
"हो, पण तुम्हाला कसे समजले???"
"तुम्ही चालताना अडखळत होता.. त्यावरून तर्क लावला...पण एक बोलू..."
"हो..."
"मला आवडेल माझ्या बायकोने साडी घातलेले..."
"मी सवय करून घेईन...”
बस्स्... माझ्या या प्रश्नाने मला पाहिजे तो कौल दिला होता...
यावरून मला आठवले की पहिल्यांदा बघितले तेव्हाच ती मला आवडली होती... आणि हेच विसरलो होतो....

मी गाडीला ब्रेक लावला. आताशा मला हा रस्ता पाठ झालाय. कितीही विचारात असलो तरीही मी हा रस्ता चुकत नाही. ऑफीस म्हणजे माझे दुसरे घरच झाले आहे... इथे खूप जवळचा असा मित्र आहे अर्णव आणि नेहमी मदत करणारी मैत्रीण आहे प्रभा. जेव्हापण हे दोघे सोबत असतात, ऑफीस लाइफ मस्त जाते. तसे या अर्णवला प्रभा आवडते. पण ऑफीसवाल्यांना खात्री आहे की प्रभाला मी आवडतो आणि अगदी माझे लग्न झाले तरीसुध्दा. असो, पण मी आणि अर्णव कधीही प्रभाचा विषय नाही काढत. किंबहुना त्याला नाही आवडत..मी प्रभाबरोबर बोललेले. पण तरीही त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये फरक नाही पडत.

ऑफीसमध्ये पोहोचलो आणि प्रभाच्या डेस्कवर गेलो तर अर्णव तिच्याशी बोलत होता. मी गप्पपणे माझ्या क्यूबिकलमध्ये जाऊन बसलो आणि कामाला लागलो. आज कामात माझे मन लागत नव्हते. मी हिच्याच विचारात होतो. मला तिच्याशी बोलायचे होते, पण मन धजत नव्हते. हक्काची बायको असूनही, एक अनामिक भीती होती मनात. तरीही हिंमत केली आणि फोन लावला. तिने उचलला.
"अग.. काय करतेस??"
"काही नाही... किचन साफ करत होते. "
"अच्छा.."
"फोन का केलात?? काही विसरलात का???"
आता हा काय प्रश्‍न झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि गप्प झालो...
"सहज केला होता...चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतो. अर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊ. आम्ही दोघे कॅंटीनमध्ये आलो.


आता तिचा कॉल आला....





(क्रमशः)


रोल नंबर ४३