Saturday, May 14, 2011

निशाना (भाग १)

बास!!! आता खूप झाले!!!!! यार मी इकडे का आलो!!! तेच समजत नाही. गेल्या महिन्यात मला इकडे माझे असे कोणी भेटलेच नाही. एकदम एकाकी वाटायला लागलेय. भारतातच बरे होते. पकलोय तर फोन उचलायचा आणि कॉल करायचा. कोणी ना कोणी तर नक्की भेटतो बोलायला. नाही भेटले कोणी ते गर्लफ्रेंड होतीच. इकडे तर बोलायला कोणीच नाही. भारतात कॉल करायाच म्हटले तर महाग पडते आणि जरी हिंमत करायची इच्छा झालीच तरी वेळेचा फरक लगेच दिसतो. जेव्हा मी उठतो तेव्हा भारतात संध्याकाळ झालेली असते. सकाळी सकाळी काही वाटत नाही. पण जसा जसा दिवस सरकत जातो तसे तसे एकटेपणा वाढत जातो. तरी बरे मानवाने इंटरनेटचा शोध लावलाय. त्याने कमीत कमी बोलायला तरी भेटते आणि तेही फुकटात. नाहीच झाले तर फेसबूक आहेच टाइमपससाठी. अगोदर ओर्कुट हा मोठा टाइमपास होता. पण आज जर म्हटले की मी ओर्कुटवर आहे तर लोक खासकरून मुली आपल्याला खेड्यातला समजतात. तसे मी आणि माझी गर्लफ्रेंड ओर्कुटवरच भेटलो. बरीच वर्षे ओर्कुटवर काढल्यावर तिला जगासोबत पुढे जावेसे वाटले. तर ती माझ्या मागेच लागली की फेसबूक जॉइन कर, फसेबूक जॉइन कर. कारण विचारले तर म्हटली, "माझ्या मैत्रिणी तुला मागसलेला म्हणतात. पूर्ण जग फेसबूकवर शिफ्ट झाले आणि तू अजूनही ओर्कुटवरच." अशी तडक गेली डोक्यात... वाटले म्हणावे की जा आणि कोणी फेसबूकवरच शोध कोणी. पण प्रेमात आणि राजकारणात असे चालत नाही. भविष्यात जर युती करायची असेल तर वर्तमानात वाद नकोत. नाही तर बाबा ही जायचा आणि दसम्याही. म्हणून मीही शेवटी फेसाबूकवासी झालो, पण युती काही झाली नाही.
पण आजकाल फेसबूकवर पण टाइमपससाठी कोणीतरी शोधायचा म्हणजे प्रॉब्लेमच आहे. कारण कोणालाही रिक्वेस्ट पाठवली आणि ती अक्सेप्ट झाली तर सर्वांना कळते. चला ती अनोळखी असेल तर ठीक, पण गर्लफ्रेंड तर विचारणारच ना... की कोण आहे ती? हा प्रॉब्लेमसुध्दा मॅनेजीबल आहे. काहीही कारण सांगता येईल. जसे की जुनी मैत्रीण आहे किंवा अजुन काही दुसरे उत्तर देता येईल. पूर्ण इंजिनियरिंग तसाच तर पास झालोय, फेकून फेकून. पण मोठा प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण एखादी चांगली आणि देखणी पोरगी शोधत असतो. कारण एक तर मुली स्वता:चा फोटो टाकता आमच्यासोबत पान, फूल, फळ खेळतात. म्हणजे त्यांनी फुलाचा, फळाचा किंवा देखाव्याचा प्रोफाइल फोटो म्हणून वापर केलेला असतो. त्यातल्या त्यात ज्या अतिहुशार मुली असतात त्या ग्रूप फोटो टाकतात, जणू काही खेळच खेळत असतात... सांगा मी कोण आहे???
१०० पैकी एखादा तीर् निशन्यावर लागतो. पण १०० तीर् मारता मारता नाकी नऊ येतात. असाच एक तीर् काही महिण्यापूर्वी लागला होता, एका सुंदर आणि देखण्या निशान्यावर. स्टेप बाय स्टेप प्रगती सुरू केली होती. भारतात होतो तोपर्यंत ठीक चालू होते. पण इकडे आलो आणि आमच्या "मैत्रीच्या" रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स सुरू झाले. मुद्दाम मैत्री हाइलाइट केली... नाही तर लोक आणि माझी गर्लफ्रेंड उगाचच शंका घेतात. गर्लफ्रेण्डला तर संधीच हवी असते शंका घेण्यासाठी, सोबत असती तरीही आणि नसली तरीही. हक्कच असतोना त्यांचा. असु दे.
माझ्या नवी निशान्याचे नाव "निशाना" होते, म्हणजे निशा नाईक. सहज टाइमपास म्हणून मी तिला फेसबूक रिक्वेस्ट पाठवली होती. मार्च मध्ये पाठवलेली रिक्वेस्ट जून उजाडला तरी बघितली गेली नव्हती. शेवटी वैतगलो आणि तिला पोक केले. सोबत झणझणीत असा एक मेसेजाही पाठवला. मला माहीत होते की ती मेसेज वाचल्यावर उत्तर येणारच आणि तो आलाही. आता हळू हळू मेसेजींग चालू झाली.
एकदा सहज विचारले "रिक्वेस्ट आक्सेप्ट का नाही केलीस अजुन?"
"तुला ओळखते कुठे अजुन?". ती उत्तरली.
"आपण गेले महिनाभर मेसेजींग करतोय. त्यात मी कळालो नाही का अजुन?"
"छे. ती तर मी फक्त तुझ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत."
गरर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!! कसला राग आला होता मला हे उत्तर ऐकून. सांल मी काय महिन्यापासून झक मारतोय? पण याचेही कौतुक वाटले की पोरगी शहाणी होती. मग मी ही तसेच उत्तर दिले, अगदी शालीनतेने. त्याचे काय असते... मुली ना खूप भावनप्रधान असतात. एखादे भावनिक वाक्य मारले ना की त्या थोडा जास्त विचार करतात आपला. एकदा का जर तुम्ही तुमच्याबद्दल साधी भावना निर्माण करण्यात यसश्वी झाले तर ती तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही म्हणजे मासा गळाला लागलाच म्हणून समजा....
"मला माफ कर. माझ्यामुळे उगाचच तुझ्या बोटांना आणि मुख्यत्वे तुझ्या मेंदूला त्रास झाला. थोड्या प्रमाणात का होईना पण तुझ्या घरची वाया गेलेली वीज आणि की-बोर्डची झालेली झीज, यासाठी ही मला माफ कर. या चुकी साठी मी तू सांगशील ते प्रायश्चित्त करण्यास मी तयार आहे."
आणि या मेसेजाचा अपेक्षित असा परिणाम झाला होता. तिने माझी फ्रेंड-रिक्वेस्ट अप्रूव केली होती. नंतर काय मग.. फोटो शेरिंग, एकमेकांचे पोस्ट लाइक करणे नित्याचेच झाले. मध्ये एकदा म्हटली " तुला माझ्या प्रोफाइलवर माझ्या मैत्रिणिंचे पोस्ट नाही का आवडत?" मग काय तेव्हापासून तेही लाइक करणे चालू केले, कितीही बावळटासारखे लिहिले असतील तरीही. एकदा तिच्या मैत्रिणिने वाईट म्हटलेल्या फोटोलाही मी लाइक केले होते, तर मला त्या फोटोमध्ये नसलेलेही चांगले गुण शोधावे लागले होते.
नाही म्हटले तरी मी हळू हळू तिच्यामध्ये गुंतत होतो. एकदा ती अशीच सांगता निघून गेली. बरेच दिवस मे फसेबूकच्या वार्या केल्या पण काही उपयोग नाही. नाही नाही ते विचार मनात आले. ती अशी सांगता कशी जाऊ शकते. काहीतरी कारण असले पाहिजे, नाहीतर ती का जाणार? मी सर्व शक्यता पडताळून बघीतल्या. माझा कोणत्या गोष्टीचा राग आला असेल का??? माझी कॉमेंट आवडली नसेल का? इत्यादी इत्यादी...नाही तसे काही नव्हते. हवमानात झालेल्या बदलामुळे ती आजारी पडली असेल का??? .. नाही जरी आजारी पडली असती तरी ऑनलाइन तर आली असती ना... माझ्याकडे तिचा नंबर ही नव्हता. नाही तर कॉल केला असता. काय झाले असेल काहीच समजत नाही. आणि तिला ही कळत नाही की कोणीतरी तिची दररोज वाट बघत असेल.. काळजी करत असेल. खुशाल ना सांगता गायब झाली. येऊ दे तिला... नीट बघतो...
(क्रमश:)