Monday, November 14, 2011

पहिली भेट - भाग १


ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.


अशु , राज आणि सुजित यांचे त्यांनी केलेल्या मदतीबद्दल खूप खूप आभार...

____________________________________________________________




मला सकाळी सकाळी जाग आली. सहा वाजले होते. जास्त हालचाल केली नाही. तिला जाग आली असती कारण तिचा हात माझ्या छातीवर होता. हळुच तिचा हात उचलला आणि बाजूला झालो. उठलो आणि ब्रश करून बाहेर गॅलरीत आलो. आकाश पूर्व दिशेला सुंदर अश्या तांबुस रंगात न्हाऊन निघाले होते. डोंगराच्या पलीकडून सूर्य बाहेर येण्यासाठी आतूर झाला होता. सूर्याची सोनेरी किरणे बाहेर येऊ लागताच माझ्या वेड्या मनाला एक इच्छा झाली, हा सूर्योदय तिच्यासोबत बघण्याची. मान वळवून खिडकीमधून तिच्याकडे बघितले तर ती अजूनही झोपेतच होती. खूप सुंदर दिसत होती. सूर्याची कोवळी किरणे तिच्या चेहर्‍यावर पडल्याने एरवीचा तजेला वाढला होता. ती अगदी परीसारखी दिसत होती. तिचे ते ओठ आणि त्यावरच्या कोरीव आणि रेखीव भेगा नेहमीच घायाळ करतात मला. एरवी ती लीप-स्टिक लावते तेव्हा एवढे छान दिसत नाही आणि संध्याकाळी मी ऑफीसमधून घरी येईपर्यंत लीप-स्टिक उडून गेलेली असते. आणि नसेलच तर ती रात्री पुसली जाते. तिला अजुन कधी सांगितले नाही लीप-स्टिकबद्दल. पण आता तर तिचे ओठ बघून मी पुरता घायाळ झाला होतो. तिचे पूर्ण उशीभर पसरलेले केसही फार छान दिसत होते. सूर्याच्या किरणांमुळे त्यांना ग्लो आला होता आणि त्यामुळे ते चमकत होते. तिच्या केसांमध्ये मला गुरफटून जावेसे वाटत होते. तिच्या लांब, पण लहानपणी वेण्या घातल्यामुळे थोडे कुरळे झालेल्या केसांमध्ये मला हरवावेसे वाटत होते. आता मात्र मला स्वत:चा हेवा वाटत होता, एवढी सुंदर बायको भेटल्याबद्दल. आता मात्र मला खरंच म्हणावेसे वाटते की,

देख कर तुमको यकिं होता है
कोई ईतना भी हसीन होता है
देख पाते हैं कहाँ हम तुमको
दिल कहि होश कहि होता है...

सूर्य जरा जास्तच बाहेर आल्याने तेज थोडा वाढला होता. तिच्या चेहर्‍यावर होणारी चुळबुळ आणि तिची शरीराच्या हालचालीने त्याचा फरक जाणवला. मी लगेच धावत बेडवर गेलो आणि हळूच तिच्या कानात म्हटले,

"ए, उठ ना... मला ऑफीसला जायला उशीर होईल..."

"तुम्ही आंघोळ करून घ्या. मी उठतेच..."

मी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि आंघोळीला गेलो. जाताना मागे वळून बघितले तर मी परत घायाळ झालो. तिने मस्त अंगडाई दिली होती... कसली सुंदर दिसत होती. अगोदर कधी एवढी सुंदरता, एवढे प्रेम, एवढ्या भावना हिच्यासाठी अनुभवल्या नव्हत्या. जेव्हा अश्या भावना येतात तेव्हा आपण असे काही नवीन प्रयोग करतो, जे त्यावेळी ठीक वाटतात पण थोड्यावेळाने आपल्याला समजते की आपण किती मूर्ख आहोत आणि हे सर्वच पुरूष करतात तर त्याला मी अपवाद कसा असणार?... धावत गेलो आणि टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन आलो... ती गालात हसली आणि थोड्या शंकेनेच विचारले,

"ठीक आहे ना सर्व काही???"

मी म्हटले, "का गं? असे का विचारलेस??"

"नाही.. आज अगदी टूथपेस्ट आणि ब्रश हातात आणून दिलेत म्हणून विचारले". ती म्हटली.

"अगं, आज थोडा उशीर झालाय ना.... अजुन जास्त नको व्हायला म्हणून ...". मी म्हटलो आणि आंघोळीला निघालो.

जाताना मी एक कटाक्ष टाकला तेव्हा ती घड्याळ बघत होती आणि पुन्हा हसली. कारण काही उशीर झाला नव्हता आणि मला जे उत्तर तेव्हा सुचले ते दिले होते. माझा अतिउत्साहीपणा नडला होता. तिला शंका आली होती माझ्या वागण्यावर...अश्या गोष्टींमध्ये बायको नावाच्या व्यक्तीचे डोके फार भन्नाट चालते. पण तिलाही समजले नव्हते की आज माझ्यात हा बदल कसा झाला?

आज माझ्यात थोडा बदल झाला होता. मी थोडासा फास्ट झालो होतो. पटकन आंघोळ आवरली आणि मनाशी निश्चय करून बाहेर निघालो की आता परत असा मूर्खपणा नाही करायचा. बेडवर तिने माझे आज घालायचे कपडे काढून ठेवले होते. पटकन तयार झालो. ती आंघोळीला गेली होती म्हणून वर्तमान पत्र घेतले आणि वाट बघत बसलो चहाची. वर्तमान पत्र वाचण्यात काहीच लक्ष नव्हते. विचार केला आपणच चहा बनवावा आणि वळलो किचनकडे... ते ही उत्साहात... चहा उकळायला आलाच होता तेवढ्यात ती बाहेर आली आणि परत माझ्याकडे आश्चर्याने बघत परत गालातल्या गालात हसली. आहहा... काय सुंदर दिसत होती. तिच्या ओल्या केसांच्या बटा नियत फितूर करत होत्या. पण तिच्या त्या हसण्यामुळे मी परत भानावर आलो आणि मला परत असे वाटले की मी मूर्खपणा केला आहे. ती माझ्याकडे बघत चालू लागली ते चेहर्‍यावर जरासे शंकेचे भाव घेऊनच. मी थोडासा विचलित झालो, पण यावेळी सकाळसारखे फालतू उत्तर नाही द्यायचे असे ठरवले होते.

"आज काय झालाय तुम्हाला???" तिने विचारले....

"कुठे काय? काही नाही", मी उत्तरलो.

"नाही .. सकाळपासून बघतेय तुमची उठाठेव... अचानक काय झाले तुम्हाला??"

"तसे काही नाही ग... सहजच... उगाच उशीर नको व्हायला म्हणून हे सर्व काही..."

"काहीच लेट नाही झाले आहे.. सर्व काही वेळेवर आहे. तुमचीच धावपळ चालू आहे.."

"अग.. तसे काही नाही आहे... सहज आपलं... तुला मदत म्हणून.... तुला नाही आवडले का??", असे म्हणत मी तिला जवळ खेचले... हा सर्वात चांगला उपाय असतो... कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडण्याचा....फक्त बायको किंवा प्रेयसीसाठीच....

"आवडले ना... पण अचानक हे सर्व काही... ", ती बोलायची थांबली… अचानक झटका दिला आणि बोलली...

"तुम्हाला उशीर होतोय ना... मी चहा देते... तो पर्यंत तुम्ही तुमचे वर्तमान पत्र वाचा...."

निघालो मी शहाण्या बाळासारखा वर्तमान पत्र वाचायला... तिला शंका तर नक्कीच गेली होती माझ्या वागण्यावर... मी ही थोडासा सावध झालो होतो. तिला आता काही सरळ सरळ समजू द्यायचे नव्हते. तिला बघताना पण चोरून चोरून बघत होतो... खूप वाईट दिवस आले होते माझ्यावर... स्वतःच्या बायकोला पण चोरून बघावे लागत होते. :) ती किचनमध्ये खूप फास्ट होती. तिने चहा तर दिलाच पण लगेच डब्बा पण दिला... मग मात्र नाइलाजाने ऑफीसला निघावे लागले.

कारमध्ये बसलो आणि विचारचक्र सुरू झाले.....

(क्रमशः)

रोल नंबर  ४३